कात्रज घाटातून नारायणपूरच्या दिशेने रोमांचक ट्रेक, ज्यामध्ये सह्याद्री पर्वतांची नयनरम्य दृश्ये आणि आव्हानात्मक वाटचाल अनुभवता येते.
आजचा ट्रेक काहीसा वेगळा असणार होता, पण काही कारणास्तव योजना बदलावी लागली. रेंज ट्रेक करायचाच होता, त्यामुळे कात्रज ते नारायणपूर ट्रेक ठरवला. एकूण सहा जण या साहसी प्रवासासाठी तयार झाले.
आम्ही पहाटे 5:40 ला जुना बोगदा गाठला आणि 5:45 ला ट्रेकला सुरुवात केली. आंबीलढाग पर्यंतचा मार्ग परिचयाचा होता, पण त्यापुढे वाट शोधावी लागणार, हे ठाऊक होतं. आंबीलढाग येथे STF (सह्याद्री ट्रेकिंग फौंडेशन) चे अनुभवी सदस्य भेटले. त्यांनी गराडे गावापर्यंत कसा जावं हे समजावून सांगितलं.
STF च्या दिवेघाटाकडे जाणाऱ्या ग्रुपसोबत थोडं चालून आम्ही उजवीकडे वळलो. काही अंतर चालल्यानंतर काळूबाई (गॉगलवाडी) मंदिर दिसले. माळरानात वसलेले हे सुंदर आणि सोयीसुविधांनी युक्त मंदिर पाहून मन प्रसन्न झाले. देवीचे दर्शन घेऊन पुढील प्रवास सुरू केला.
समोर चतुरभुज मंदिर खुणावत होते, तिथूनच नारायणपूरची वाट जात होती. लहान पाझरतलाव पार करत, फोटो काढत आम्ही चतुरभुज मंदिर गाठलं. श्रावणात मंदिराचे दर्शन घेतल्याने मन समाधानाने भरले. मंदिर परिसर विकसित केलेला असून, वातावरण आल्हाददायक आहे. तिथे घरून आणलेला नाश्ता करून आम्ही पुढे निघालो.
गराडेपर्यंतचा मार्ग उतरणीचा होता. रावडेवाडी आणि गराडे गावात प्रवेश करताना आम्ही पंचमुखी मंदिर गाठले. तिथे अनोखे शिवलिंग पाहायला मिळाले. आता ऊन तापू लागले होते, मग चहा पिऊन पुढे कुमथाळ वस्तीमार्गे सोमूर्डीपर्यंत निघालो. इथून पुढे संपूर्ण वाट माळरानातून होती.
सोमूर्डी गाठून पुढील वाट विचारून आम्ही चालू लागलो. एक छोटासा वाहता ओढा पार करून पुढे जावे लागले. ठोस पायवाट नसल्यामुळे आम्ही सूर्यपर्वत आणि चंद्रपर्वताच्या पायथ्याला जायला निघालो. थोड्याच वेळात पोखर गाव दिसले आणि ट्रेक संपणार हे लक्षात आले. पोखरला पोहोचल्यावर जोरदार पाऊस सुरू झाला, त्यामुळे थांबावे लागले. पाऊस ओसरल्यानंतर नारायणपूरला 2:45 ला पोहोचलो आणि दत्ताच्या चरणी नतमस्तक झालो.
या ट्रेकमध्ये एकूण 26.50 किमी अंतर कापत, साधारण 9 तासात ट्रेक पूर्ण झाला. आजचा ट्रेक खऱ्या अर्थाने ऑफबीट होता. संदीप दादांनी दिलेली फाईल गॉगलवाडीपासून सुरू होणारी होती, परंतु आमचा मार्ग वेगळा होता. तरीही दैवाने साथ दिली, आणि आम्ही सुखरूपपणे नारायणपूरला पोहोचलो. दत्त महाराजांच्या आशीर्वादाने लगेचच वाहन मिळाले, आणि परतीचा प्रवास सुरू झाला.
लेखन: साकेत मिठारी
Thank you for consideration