घोळ – गरजाईवाडी – टाळदेव – सांदोशी – राजधानी शिवतीर्थ रायगड
रायगड म्हणजे पुरुषार्थ आणि पराक्रम यांचें प्रेरणास्थान. जो महाराष्ट्र देशीं जन्मला, त्या त्या प्रत्येकानें जन्मातून एकदा तरी रायगडची वारी केलीच पाहिजे.
रायगड वारी कितीदा केली तरीही अपुरीच! रायगड पूर्ण समजून घ्यायला असंख्य वाऱ्या पण अपुऱ्याच. रायगडावर गेल्यावर इतिहास ऐकताना अंगावर शहरेच उभे राहतात. जसा वेग वेगळ्या वाटांनी किल्ला पाहावा तसेच वेग वेगळ्या ऋतूत हि किल्ला पाहावा जेणेकरून त्याची रूप न्याहाळता येतात. ह्यापूर्वी हिवाळ्यात , उन्हाळ्यात रायगड वारी झाली होती आणि पावसाळ्यात पाहण्याची इच्छा ह्या वारीमुळे मुळे पूर्ण झाली.
ह्या रायगड वारीसाठी आम्ही सकाळी 4 वाजता पुणे सोडले आणि पानशेत मागून थेट घोळ गाठले. जाताना तुरळक पाऊस , हिरवाई , धुक्याची चादर लक्ष वेधून घेत होती. गाडी हलत डुलत घोळ मधून पुढे निघाली आणि इथं घोळ झाला , भयानक चिखलामुळे गाडी पुढं जाण कठीण होत. धक्का मारून पण गाडी पुढं जाण कठीण होत. गारजाई वाडी ऐवजी आम्ही इथूनच ट्रेक सुरु केला आणि चालत गरजाईवाडी गाठली. गरजाईवाडी म्हणजे कोकणदिव्यासाठी पायथा. गावातून कोणी येईल का याची चाचपडणी केली पण भातलावणीची काम असल्यानं कोणी येण्यास तयार नव्हतं, अखेर साकेत कडे असलेल्या GPX फाईल वरून पुढचा मार्ग पकडला. घनदाट जंगलातून जाणारा मार्ग कोकणदिव्याच्या पठारापर्यंत तोच होता आणि इथून पुढं कस लागणार होता. अर्ध्या तासातच आम्ही पठार गाठले आणि धुक्याच्या चादरीआड कोकणदिव्यावर भगवा फडकत असलेला पाहून तीन वर्षांपूर्वीच्या कोकण दिव्याच्या आठवणी ताज्या झाल्या. कोकणदिवा म्हणजे रायगडाच्या उत्तरेला आणि ह्याच्या मथवरून रायगड तसेच जगदीश्वराच मंदिर नजरेस पडते. मुख्यतः रायगडावर आणि घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ह्याचा वापर होत असावा. कोकणदिव्याच्या बाजूने जाणारी वाट पकडली आणि थोडं पुढं गेल्यावर जाणवलं कि वाट पूर्ण मळलेली आहे जी टाळदेव आणि सांदोशी कडे जात होती. झाडा झुडपातून , धबधब्यातून वाट काढत आम्ही एका खिंडीत पोहचलो जिथून एक वाट टाळदेव तर दुसरी सांदोशी कडे जाणार होती, आणि आम्ही बरोबर मार्गावर होतो. आम्ही सांदोशीच्या आधीच चक्क एका छोट्या धबधब्यात बसून घरून नेलेली शिदोरी खाल्ली आणि सांदोशीमार्गे साधारण 12 च्या दरम्यान रायगड पायथा गाठला. पावसाची सर जा ये करत होती. चालण्याच्या गतीमुळे अर्थात आमच्यात दोन गट झाले आणि दर्शन घेऊन पायथ्याला हॉटेल ला भेटायचे ठरले. साधारण 1:20 ला माथा गाठला, शिरकाईदेवी , सिंहासनारूढ महाराजांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन, होळीच्या माळावरून लांबूनच जगदीश्वराचे दर्शन घेतले त्याचे कारण म्हणजे भयानक गर्दी.
उतरताना पावसाने चांगलाच जोर धरला होता. जे जाताना मनमोहक धबधबे होते त्यांनी रौद्र रूप धारण केले होते. अखेर पावसाचा जोर पाहून आम्हीही वेग वाढवला आणि एका अशा ठिकाणी पोहचलो जिथं धबधब्यामुळे पुढची वाटच बंद झाली होती. पाण्याच्या प्रवाहाबरोबर छोटे मोठे दगडही प्रवाहाबरोबर खाली येत होते, त्यासमोर माणसांचा लोंढा लागला होता. धड वरही जाता येईना कारण वरच्या धबधब्यानं ही चांगलाच जोर धरला होता. आहे त्या जागेवर एक तास वाट पाहिल्यानंतर आणि पावसाचा जोर कमी झाल्यावर एक एक जण धबधब्यखालून वाट काढत पुढे जात होते आणि अखेर जगदीश्वराच्या कृपेने सर्वानी सुखरूप पणे पायथा गाठला आणि सुटकेचा निश्वास सोडला.
(रायगडचं रौद्र रूप जवळून पाहिलं ! एक तास काय अवस्था झाली होती हे सांगण्यापलीकडचं आहे.)
अखेर पायथ्याला अडवा हात मारून कधी हि न विसरणाऱ्या आठवणींनी पुणे गाठले.
भेटूया लवकरच पुढच्या भटकंतीला